Sunday 23 February 2014

कौठाची बर्फी

आई तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारत असताना जर तुम्ही फोन केलात, तर [तुम्ही कितीही मोठे झाले असाल तरीही] कसला ओरडा पडतो ...... कोणीतरी तिला त्यांच्या सुख-दु:खाच्या कथा ऐकवत असताना तुम्ही व्यत्यय आणणे म्हणजे त्या सांगणाऱ्या व्यक्तीवर कोण अन्याय ? ... आज काहीसे असेच झाले , त्यामुळे तुमची कौठाची बर्फी करताना चुकली तर त्याला मी किंवा माझी पाककृती जबाबदार नाही तर त्या व्यक्तीचा शाप माझ्या लिखाणातून तुमच्या पर्यंत आला आहे ,असे समजावे . :)

कउठ हे ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारे फळ . माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीला सीताफळ ,रामफळ , कउठ ,ई. फळे विकत घेत असतात हेच नवीन . आमच्या कडे बर्यापैकी सगळ्यांच्या दारात ही झाडे असतात . ज्यांच्या कडे नाहीत त्यांना वानवळा दिला जातो . शहरात मात्र मंडई मध्ये कउठ [विकत] मिळते . उपवासाला हमखास चालणारे फळ ,गोड आणि तिखट दोन्ही प्रकारे पदार्थ बनवता येणे ही त्याची खासियत. दिसायला सुंदर नसूनही कवठा पासून चटणी , jelly , बर्फी ,ई. सुंदर सुंदर पदार्थ बनवता येतात .

साहित्य :
कउठ [कवठ / कउठ]  १
दुध १ कप
साखर १ वाटी
नारळ १ [खवलेला]
पिठी साखर अर्धी वाटी

कौठ फोडून त्याचा गर व दुध मिक्सर मध्ये बारीक करून घेणे . बारीक केलेला गर ,साखर व खवलेला नारळ काढईत चांगला घट्ट गोळा होईपर्यंत आटवणे .आटलेले मिश्रण थंड झाले की अर्धी वाटी पिठी साखर त्यात एकत्र करून चांगले मळून घेणे .ताटलीला तुपाचा हात लावून मिश्रण चांगले थापून ठेवणे . सुरीने एकसमान बर्फीच्या आकारात कापणे .

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई)

No comments:

Post a Comment