Sunday, 23 February 2014

कौठाची बर्फी

आई तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारत असताना जर तुम्ही फोन केलात, तर [तुम्ही कितीही मोठे झाले असाल तरीही] कसला ओरडा पडतो ...... कोणीतरी तिला त्यांच्या सुख-दु:खाच्या कथा ऐकवत असताना तुम्ही व्यत्यय आणणे म्हणजे त्या सांगणाऱ्या व्यक्तीवर कोण अन्याय ? ... आज काहीसे असेच झाले , त्यामुळे तुमची कौठाची बर्फी करताना चुकली तर त्याला मी किंवा माझी पाककृती जबाबदार नाही तर त्या व्यक्तीचा शाप माझ्या लिखाणातून तुमच्या पर्यंत आला आहे ,असे समजावे . :)

कउठ हे ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारे फळ . माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीला सीताफळ ,रामफळ , कउठ ,ई. फळे विकत घेत असतात हेच नवीन . आमच्या कडे बर्यापैकी सगळ्यांच्या दारात ही झाडे असतात . ज्यांच्या कडे नाहीत त्यांना वानवळा दिला जातो . शहरात मात्र मंडई मध्ये कउठ [विकत] मिळते . उपवासाला हमखास चालणारे फळ ,गोड आणि तिखट दोन्ही प्रकारे पदार्थ बनवता येणे ही त्याची खासियत. दिसायला सुंदर नसूनही कवठा पासून चटणी , jelly , बर्फी ,ई. सुंदर सुंदर पदार्थ बनवता येतात .

साहित्य :
कउठ [कवठ / कउठ]  १
दुध १ कप
साखर १ वाटी
नारळ १ [खवलेला]
पिठी साखर अर्धी वाटी

कौठ फोडून त्याचा गर व दुध मिक्सर मध्ये बारीक करून घेणे . बारीक केलेला गर ,साखर व खवलेला नारळ काढईत चांगला घट्ट गोळा होईपर्यंत आटवणे .आटलेले मिश्रण थंड झाले की अर्धी वाटी पिठी साखर त्यात एकत्र करून चांगले मळून घेणे .ताटलीला तुपाचा हात लावून मिश्रण चांगले थापून ठेवणे . सुरीने एकसमान बर्फीच्या आकारात कापणे .

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई)

Saturday, 22 February 2014

पालकाची भाजी

पालकाची भाजी करूयात म्हंटल्यावर 'woww / मस्तच / धम्माल /माझी आवडती ' अशी प्रतिक्रिया अभावानेच.  मोठे [ वयाने ] झाल्याशिवाय काही भाज्यांची गोडी कळतच नाही . त्यापैकीच पालक एक . अगदी लहान नुकत्याच भात खाऊ लागलेल्या बाळाच्या भातात सर्वप्रथम ज्या भाज्यांचा नंबर लागतो त्यातील पालक एक असूनही नंतर नावडत्या भाज्यांमध्ये त्याचे नाव कसे समाविष्ट होते कळतच नाही .पालक खरेतर खूप धम्माल भाजी , पालक-पनीर , पालक-पुरी , पालक-पराठा ,पालक-डोसा ,पालक-भजी , ई. प्रचंड आवडीचे पदार्थ पालकाच्या नावावर असून देखील पालक आवडत्या भाज्यांच्या रांगेत पहिल्या पाचात कधीच नसतो . पण मला खात्री आहे  , आजच्या आपल्या पाककृती पालकाला ते मानाचे स्थान नक्कीच मिळवून देतील .

पालकची भाजी : नं १ 
पालक १ जुडी
मुगाची  डाळ अर्धी वाटी
टोमेटो अर्धा
मिरच्या ४
लसूण ४ पाकळ्या
आले एक छोटा तुकडा
मीठ दीड चमचा [आवडी प्रमाणे ]
फोडणीसाठी : तेल 2 चमचे ,मोहोरी ,हिंग ,हळद ,ई.

पालक धुवून ,निवडून ,चिरून घेणे .मुगाची डाळ धुवून चिरलेल्या पालकात एकत्र करून कुकर मध्ये शिजवून घेणे .शिजवल्यावर चांगले घोटून घेणे .
कढईत तेल टाकून ,गरम करून ,मोहोरी ,हिंग ,हळद ,ई टाकून फोडणी करून घेणे ,फोडणीत शिजवलेला पालक व मुगाचे घोटलेले मिश्रण टाकणे .गरम पाणी टाकून मिश्रण थोडे सैलसर करुन घेणे . त्यात लसूण ,मिरची ,आले मिरची कटर मधून काढून टाकणे .टोमेटो बारीक चिरून वरून टाकणे . मीठ टाकून भाजीला मंद आचेवर उकळी आणावी .
------------------------------------------------------------------------------------------------------------

पालक भाजी:  नं 2
साहित्य 
पालक १ जुडी
डाळीचे पीठ पाव वाटी
ताक १ वाटी
लसूण ६ पाकळ्या
मिरच्या ६
[फोडणीचे साहित्य वरीलप्रमाणे ]

पालक धुवून ,निवडून ,चिरून , शिजवून घेणे. शिजवलेल्या पालकात डाळीचे पीठ घालून चांगले घोटून घेणे .
काढईत तेल टाकून .मोहोरी ,बारीक चिरलेल्या मिरच्या , सोलून बारीक चिरलेला लसूण टाकणे ,लसूण  गुलाबीसर चोकलेटी रंगाचा झाला कि त्यात हळद ,हिंग घालून ताक  व पालकाचे घोटलेले मिश्रण टाकावे .मीठ घालून उकळी आणावी .
------------------------------------------------------------------------------------------------------------

पालकाची भाजी : नं ३
सांगायला एकदम सोप्पी 'आळूच्या भाजीप्रमाणे करावी '...... पण आळूची भाजीच येत नसेल [माझ्यासारखे ] त्यांच्यासाठी कृती देत आहे .

साहित्य :
पालक १ जुडी
डाळीचे पीठ पाव वाटी
मिरच्या ६
कडीपत्ता ४ पाने
गुळ १ चमचा भरून [पोह्याचा चमचा ]
चिंचेचा कोळ २ चमचे घट्टसर
शेंगदाणे मुठ भर  [भिजवलेले]
खोबर्याचे पात्तळ लहान काप
काळा [गोडा] मसाला १ चमचा

फोडणीसाठी : तेल 2 चमचे ,मोहोरी ,हिंग ,हळद ,कडीपत्त्याची पाने 4 , ई.

पालक धुवून ,निवडून ,चिरून , शिजवून ,डाळीचे पीठ घालून चांगला घोटून घेणे .काढईत तेल टाकून .मोहोरी ,बारीक चिरलेल्या मिरच्या, कडीपत्त्याची पाने, हळद ,हिंग घालून पालकाचे घोटलेले मिश्रण टाकावे .थोडे पाणी टाकून सरभरीत करून घ्यावे . वरून गुळ ,चिंचेचा कोळ ,भिजवलेले दाणे ,खोबर्याचे काप ,मीठ आणि १ चमचा काळा [गोडा] मसाला घालून उकळी आणणे .

[टीप : पालकांच्या पाना ऐवजी आळूची पाने वापरली की झाली आळूची भाजी तय्यार .]
------------------------------------------------------------------------------------------------------------

पालकाची [सुकी] भाजी : नं ४ 
पालकाची जुडी १
उकडलेले बटाटे २
मिरच्या ४
फोडणीसाठी : तेल १ चमचा ,मोहोरी ,हिंग ,हळद ,ई.

पालक धुवून ,निवडून ,चिरून घेणे. फोडणीसाठी गरम कढईत तेल ,मोहोरी , हळद ,हिंग ,ई घालून त्यात पालक व बारीक चिरलेला उकडलेला बटाटा व मीठ घालून ,पाणी आटेपर्यन्त मंद आचेवर शिजवणे . [पालकाला आपलेच पाणी सुटते ,वरून घालू नये]. डब्यात देण्यासाठी मस्त भाजी .

टीप ; लक्षात ठेवण्यासारखे काही .....
पालकाला मीठ इतर भाज्यांपेक्षा कमी लागते  .
लसूण गावठी ,आकाराने लहान असेल तर, ४-६ पाकल्यां ऐवजी  एक अख्खा लसूण घ्यावा .
मिरच्या कमी तिखट असतील तर ,दिलेल्या प्रमाणापेक्षा २ ते ३ मिरच्या [आवडीप्रमाणे] जास्त घ्याव्यात .

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई)






Friday, 21 February 2014

नारळाची चटणी

नारळाची चटणी फ्रीज मध्ये करून ठेवली की डोसा ,इडली ,पराठे ,पुरी , कटलेट ,ई . कोणतेही पदार्थ केले की पटकन कामास येते . कोकणात , साऊथ मध्ये ओला नारळ जास्त वापरला जातो ,देशावर मात्र सुके खोबरे , शेंगदाणे ह्यांचा मुक्त वापर . नारळाची चटणी २ दिवसापेक्षा जास्त दिवस टिकत नाही . त्यामुळे फ्रीज ला पर्याय नाही .

साहित्य :
नारळ १
फुटाण्याचे डाळे [सोल्लेले] : २ चमचे [पोह्याचा चमचा ]
मिरच्या ४
लसूण ४ पाकळ्या
किसलेले आले  अर्धा चमचा [चहाचा चमचा ]
मीठ अर्धा चमचा
जिरे पाव चमचा [चवीपुरते ]
कडीपत्त्याची पाने ४ [धुतलेली]
कोथिंबीर पाव वाटी [धुतलेली]

नारळ खरवडून घेऊन त्याबरोबर इतर सर्व साहित्य मिक्सर मधे वाटून घेणे .

फोडणी साठी साहित्य :
तेल १ चमचा
मोहोरी १ चमचा
कडीपत्त्याची पाने २
हिंग आणि हळद चिमुट भर

काढईत तेल टाकून गरम झाल्यावर  मोहोरी ,हळद , हिंग ,कडीपत्याची पाने टाकून लगेच gas बंद करणे . तयार फोडणी नारळाच्या चटणीवर टाकून हालवून घेणे .

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

इडली,डोसा .उत्तप्पा ,ई

साउथ इंडियन पदार्थ शक्यतो सगळ्यानाच आवडतात . एकदा इडली चे पीठ फ्रीज मध्ये करून ठेवले की इडली , डोसा . उत्तप्पा , ई. पदार्थ पटकन करता येतात . थोडी हरबर्याची डाळ भिजत घालून [२ ते ३ तास] ,वाटून इडलीच्या पिठात कालवली की ढोकला आणि आप्पे पण सुरेख होतात . आप्पे करण्यासाठी सगळ्या डाळी एकत्र भिजवल्या तरी चालतात. इडलीच्या पिठाला 'इडलीचेच पीठ ' का म्हणत असतील ? डोस्याचे पीठ भिजवले किंवा उत्तप्याचे पीठ भिजवले असे चुकुनही ऐकू येत नाही . परंतु साउथ इंडिअन्स मध्ये मात्र इडली , दोसा,  उत्तप्पा , आप्पे , आप्पम , ई सगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळे पीठ बनवले जाते . नुसत्या दोस्याचेच कितीतरी प्रकार आहेत . साधा दोसा ,नागलीचा डोसा , पालक दोसा , मेथी डोसा , नीर डोसा , ई .

साहित्य :
तांदूळ ३ वाटी
उडदाची डाळ  १ वाटी
मेथीचे दाणे एक चमचा [चहाचा चमचा ]
पोहे पाव वाटी
मीठ २ चमचे

डाळ , तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजवणे , पोहे व मेथीचे दाणे पण एका वाटीत भिजवणे . ८ तास भिजवल्यावर सर्व पदार्थ एकत्र वाटून घेणे .[उन्हाळ्यात ५-६ तास भिजवले तरी चालते ] . मीठ घालून ,चांगले हलवून परत ८ तास अम्बवण्यासाठी झाकून ठेवणे .
पीठ तयार झाले की ईडलीच्या भांड्यातील ताटल्यांना थोडेसे तेल लावून त्यावर पीठ टाकून १५ मिनिट मोठ्या आचेवर आणि ५ मिनिट मंद आचेवर वाफावणे . इडली stand थोडे थंड झाल्यावर सुरीने इडलीच्या कडा सुट्ट्या करून इडली काढून घेणे .

डोसा बनवन्या साठी नॉनस्टिक तव्यावर तयार पीठ अर्धा डाव घेऊन पातळ डोसा बनवणे . वरून थोडेसे तेल टाकून चांगले पसरवून घेणे . लाकडी उचटण्याने कडा सोडवून डोसा दोन्ही बाजूने शेकून घेणे .

उत्तपा बनवण्या साठी तयार पीठ [साधारण २ वाट्या ] घेऊन त्यात १ कांदा [उभा चिरलेला ], अर्धा टोमेटो [बारीक चिरून ] , थोडी कोथिंबीर , अर्धा चमचा किसलेले आले ,४ मिरच्या [ बारीक चिरून ] ,चवीप्रमाणे मीठ [मीठ जास्त लागत नाही कारण पिठात घातलेले असते ] घालून चांगले हालवून घेणे . नॉनस्टिक तव्यावर दोस्याप्रमाणेच परंतु जरा जाडसर उत्तप्पा बनवून , दोन्ही बाजूने शेकून घेणे .

अगदी तंतोतंत चव हवी असेल आणि २ वेगळी पीठे  भिजवण्याची तयारी असेल तर  :
इडलीसाठी : ४ वाट्या तांदूळ
                   २ वाट्या उडदाची डाळ

दोस्यासाठी : ३ वाट्या तांदूळ
                   १ वाटी उडदाची डाळ

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

Wednesday, 19 February 2014

कटलेट

लिम्बाचे  लोणचे तयार झाले , सरबताची पण सगळी तयारी झाली परंतू लोणचे खाणार कशाबरोबर ? पौष्टिक आणि चमचमीत , करायला सोप्पे असे कटलेट आज पाहुयात . जास्त तेलकट पण नाहीत ,घरात लहानांबरोबरच मोठ्यांनाही  आवडणारे कटलेट बनवणे पण सोप्पे आणि सुटसुटीत .

साहित्य :
२ उकडलेले बटाटे
अर्धा बीट  [किसलेला]
एक मोठे गजर / २ छोटे गाजर  [किसलेले]
अर्धा छोटा कोबी  [किसलेला]
मटार  [ मिक्सर मध्ये जाडसर करून घेणे ]
४ ब्रेड च्या स्लाईस  [मिक्सर मध्ये  बारीक करून घेणे]
४ लसणाच्या पाकळ्या ,४ कमी तिखट मिरच्या आणि कोथिंबीर [ एकत्र वाटून घेणे ]
१ छोटा चमचा मीठ  [चवीप्रमाणे ]
१ डाव तेल

ब्रेडचा थोडा चुरा बाजूला काढून बाकी सर्व सामान उकडलेल्या बटाट्या मध्ये एकत्र मळून घेणे . ह्या सारणाचे छोटे छोटे गोल करून ठेवणे . एका सपाट ताटात ब्रेडचा थोडा चुरा घेऊन त्यावर ह्या गोलांना अलगद थापून कटलेटचा आकार देऊन fry pan मध्ये थोडेसे तेल टाकून मंद आचेवर शेकून घेणे .शेकत असताना झाकण ठेवले तरी चालते .दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत शेकले की झाले आपले कटलेट तय्यार .  कटलेट बरोबर हिरवी चटणी , चिंचेची चटणी पण छान लागते .
नुसते कटलेट तर छान लागतातच परंतु घरात गोल burger चा ब्रेड असेल तर मधोमध कापून दोन्ही बाजूला आतल्या बाजूने चटणी , butter लावून एका भागावर कटलेट ठेऊन कांदा , टोमेटो , बीट चे काप ठेऊन दुसरा अर्धा भाग वरून बंद करून मस्त घरगुती burger तयार होते .

चवीला सुंदर ,करायला सोप्पे आणि गाजर ,बीट, कोबी , मटार सारख्या पौष्टिक भाज्याही बिनबोभाट पोटात जाणार . अजून काय हवे ?

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई)

Monday, 17 February 2014

लिंबाचे लोणचे

 हिरवी , पिवळी लिंब झाडावर ,बाजारात , फ्रीज मध्ये कोठेही नजरेस पडली तरी मनाला उत्साह देऊन जातात.  लिम्बातून. 'सी' विटामीन  मिळते असा शास्त्रीय विचार मनात न आणता देखील लिंबाचे पदार्थ आवडीने सेवन केले जातात . शिवाय लिंबाच्या सेवनाचे 'side effects' काहीच नाहीत . थोडेसे आंबट , थोडेसे तुरट चवीचे लिंबू न आवडणारा विरळाच .सध्या बाजारात लिंब भरपूर मिळत असल्याने ,सलग तिसरी पाककृती लिम्बाचीच आहे .माझी आई फक्त 'लिंबाचे पदार्थ करण्यात माहीर आहे' असा कृपया गैरसमज करून घेऊ नये .

लिंबाचे  लोणचे :
लिंब २५
लिम्बाच्या लोणच्याचा मसाला १०० ग्राम [बाजारात उपलब्ध असलेला ]
मीठ १ वाटी
साखर १ किलो

लिंब चिरून ,बिया काढून MIXER मधून बारीक करून घ्यावीत , त्यात लोणच्याचा मसाला ,मीठ आणि साखर घालून , हलवून रात्रभर पातेल्यात ठेवावे .दुसर्या दिवशी नीट हलवून बरणीत भरून ठेवावे .... १-२ दिवसात खायला तयार लोणचे मिळते .

टीप : एकही बी जाता कामा नये ,अन्यथा लोणचे कडू होते .

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

Sunday, 16 February 2014

लिंबू सरबत

हल्ली मुलांना  ऋतू शिकवणे फारच कठीण होऊन बसलेय .अनाकलनीय निसर्गाची अनेक मजेशीर रूपे अचानक कधीही कोणत्याही काळात बघायला मिळतात . काल मैत्रिणीने, फेब्रुवारी महिना असून देखील, तिच्या खिडकीतून दिसणार्या इंद्रधनुष्याचा फोटो पाठवला .थंडी ,पाऊस आणि फेब्रुवारी हे समीकरण काही पचनी पडत नाही .
  आपल्या लहानपणी साधारणपणे जानेवारी मध्ये उन्हाळ्याला सुरवात होत असे .फेब्रुवारी मध्ये कडकडीत उन पडत असे. घराघरात लिंबू सरबताची जोरदार तयारी असे . कैरीचे पन्ह येण्या आधी लिंबू सरबतालाच मागणी असे . आईच्या हातच्या लिंबू सरबताची मज्जाच काही और .

लिंबू सरबत
साहित्य :
लिंबाचा रस एक वाटी
साखर तीन वाट्या
मीठ  एक चमचा [हळदीचा बारीक चमचा]

एका जाड बुडाच्या पातेल्यात तीन वाट्या साखर घेणे, साखर बुडेल इतके पाणी टाकून .पाक बनवणे .[पाकचा थेंब ओट्यावर टाकला असता त्याची घट्ट गोळी होते .म्हणजेच पाक झाला ] .ग्यास बंद करून .लिंबाचा रस आणि मीठ पाकात टाकून भरपूर हालवून घेणे .
मिश्रण थंड होईपर्यंत कोटनचा कपडा टाकून झाकून ठेवणे .[ताटली झाकण ठेऊ नये ].तयार झालेले लिंबू सरबताचे मिश्रण  थंड झाल्यावर  बाटलीमध्ये भरून ठेवावे.

सरबत बनवताना ग्लास मध्ये  २ चमचे मिश्रण घेऊन त्यात पाणी आणि बर्फ [आवडीनुसार ] टाकावा .

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

Saturday, 15 February 2014

नमन [नमनाला घडाभर (?) तेल ] लिंबाचे गोड लोणचे

नमस्कार ,
स्वयपाक् घराशी बरेचदा संबंध लग्न ठरल्यावरच येतो ,एक वेळेचा स्वायापाकापासून साधारण सुरवात होते . तेल किती घेऊ ? मोहोरी किती ?  हळद -मिठाचे प्रमाण करता करता खिचडी , पोहे ,कोशिंबीर , बटाटा भाजी ,साबुदाणा खिचडी , कणिक भिजवण्याची सर्कस , प्रचंड प्रयत्न पूर्वक केलेली  गोल (?) पोळी वर येऊन गाडी रेंगाळते आणि अचानक 'हम भी किसीसे कम  नाही ' चा साक्षात्कार होतो .
नव्या नवलाईचे नउ दिवस संपताना पाय जमिनीला लागतात आणि अक्षरश: त्रेधातीरपिट उडते . अनेक विचार न केलेल्या गोष्टी पोटात गोळा आणतात .जसे विरजण कसे घालायचे ? साबुदाणा भिजवताना पाणी किती घालायचे ? इ. दिवसातून दोन ते तीन फोन आईला सुरु होतात . इतके करूनही फजिती ती होतेच .
हि सर्व हत्यारे आधीच उपलब्ध असतील तर कामाचा आणि फोन चा वेळ नक्कीच वाचवता आला असता .
माझी आई, सौ पुष्पा हेरंब आवटी, हिच्या अशाच सोप्प्या , चविष्ट आणि साधारण रोज लागणाऱ्या  पाककृती देण्याचा प्रयत्न असेल . तसेच तुमच्या घरी होणाऱ्या सुंदर, सुग्रास पदार्थांचे देखील इथे स्वागत आहे .

 एका सोप्या पाककृतीने सुरवात करूयात .
लिंबाचे गोड लोणचे : [उपवासाला चालते ]
दहा लिंब [मोठी]
दोन वाट्या साखर
एक चमचा तिखट
दीड चमचा मीठ
 [आमटीची वाटी ,पोह्याचा चमचा मापाला ]

लिंबाच्या चार-चार  फोडी करून एका स्वश्च बरणीत भराव्यात ,त्यात मीठ ,तिखट ,साखर घालून चांगले हलवून ,झाकण घट्ट लावून ठेवावे .रोज एकदा सर्व मिश्रण हलवावे .दहा दिवसात लिंबाचे चविष्ट लोणचे तय्यार . :)

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई)