Tuesday, 26 May 2020

मक्याच्या कणसाचे पोहे

मक्याचे कणीस नुसते भाजून खायलाच बर्‍याच जणांना आवडते. मक्‍याच्या कणसाचे कटलेट ही आवडीने खाल्ले जातात. मक्याच्या कणसाचे दाणे काढून, ते उकडून, त्याला मीठ लावून खायला देखील बऱ्याच जणांना आवडते. आज त्याच मक्याच्या कणसांचे पोहे कसे करतात ते आपण पाहणार आहोत.

                     मक्याच्या कणसाचे पोहे

साहित्य-
१. तीन(३) कोवळी मक्याची कणसे
२. एक वाटी पोहे
३. बारीक चिरलेला कांदा एक वाटी
४. चार हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
५. फोडणीसाठी दोन मोठें चमचे तेल, कढीपत्ता, हिंग, हळद.
6. पाव वाटी भाजलेले शेंगदाणे (नसल्यास हिरवे मटार घातले तरी चालतील)
७. साखर 2 चमचे , मीठ चवीप्रमाणे
८. अर्ध्या लिंबाचा रस
९. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले खोबरे किंवा खवलेला नारळ

कृती-
मक्याची कणसे किसून घ्यावीत अर्धी वाटी पोहे धुऊन ठेवावेत, तेलात हिरवी मिरची, कढीपत्ता हिंग, हळद, जिरे/ मोहोरी घालून फोडणी करावी. त्यात कांदा चांगला परतून घ्यावा. त्यात भाजलेले शेंगदाणे पण घालावेत. दाणे नसल्यास हिरवे वाटाणे/ मटार घातले तरी चालतील त्याच्यावर पोहे आणि किसलेला मका, साखर दोन चमचे, व मीठ चवीप्रमाणे घालावे. चांगले हलवून घ्यावे, झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी, पुन्हा झाकण काढून चांगले हलवून घ्यावे परत झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटांसाठी थोडी वाफ येऊ द्यावी. पोह्यांप्रमाणे डिश मध्ये घेऊन त्यावर लिंबू पिळावे कोथिंबीर व खोबरे घालून खाण्यास द्यावे.

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई)

कवठाची जेली

गूळ घालून कच्चे कवठ सगळेचजण खातात. बरेच जण कवठाची चटणी पण करतात. मागे आपण कवठाची बर्फी कशी करायची ते पाहिले. आज कवठाची जेली शिकणार आहोत.

                    कऊठाची/ कवठाची जेली

साहित्य-
१. कवठ 1
२. पाणी
३. साखर
४. पिठाची चाळणी
५. काचेची बरणी किंवा बाऊल

कृती-
कऊठ/ कवठ फोडून त्यातील काड्या व बिया काढून गर मोकळा करून घ्यावा. त्यात तीनपट पाणी घालून उकळत ठेवावे. मिश्रण निम्मे झाल्यावर पिठाच्या चाळणीने गाळून घ्यावे. गाळलेल्या पाण्याच्या सव्वा पट साखर घालून पुन्हा उकळत ठेवावे. चांगले घट्ट झाल्यावर त्याचा एक थेंब ताटलीत टाकून पहावा, थेंब हालत नसेल तर जेली झाली असे समजावे व काचेच्या बाटलीत किंवा सटात किंवा बाउल मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे. दोन तासाने जेली सेट होते.

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

मिल्कशेक / Milkshake

मिल्कशेक साधारणपणे गर असलेल्या फळांचा चांगला लागतो. जसे सफरचंद, चिकू, आंबा, सीताफळ, खरबूज, इत्यादि. रस असलेली फळे जसे अननस, लिंबू, संत्री, मोसंबी, टरबूज,इ चा ज्यूस प्यायला मजा येते. आज आपण मिल्कशेक शिकणार आहोत त्याच्यासाठी गर असलेली फळे साधारणतः वापरली जातात.

                                   मिल्कशेक

साहित्य-
१. गर असलेले कोणतेही एक फळ  (साल काढलेले सफरचंद (१)/ चिकू(२)/आंबा(२)/ सीताफळ(२)/  खरबूज(२/३ लांब फोडी)
२. दूध 1 ग्लास
३. बर्फ अर्धा ग्लास
४. चार (४) चमचे साखर

कृती-
ज्या फळाचा मिल्कशेक करायचा असेल त्याचे साल आणि बिया काढून गर मिक्सरमध्ये घ्यावा. त्यात चार (४) चमचे साखर घालून मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावे, चांगले बारीक करून घ्यावे, त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेला बर्फ घालावा, पुन्हा मिक्सर मध्ये सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे, सगळ्यात शेवटी दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये सर्व मिश्रण फिरवून घेणे.
 ह्या सर्व प्रमाणात जर मिल्कशेक बनवला तर दोन मोठे ग्लास भरून मिल्कशेक तयार होतो.

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

सफरचंदाची बर्फी

सफरचंद खाण्यास जेवढे गोड तेवढेच त्याचे विविध प्रकारही खूपच सुंदर, चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारे असतात. साधारणतः सफरचंदाचे ज्यूस किंवा जेली आपण नेहमीच बनवतो पण सफरचंदाची बर्फी क्वचितच बनवली जाते. म्हणून आपण आत्ता सफरचंदाची ही वेगळी पाककृती शिकत आहोत.

                        सफरचंदाची बर्फी

साहित्य-
१. चार मोठे सफरचंद
२. एक मोठा नारळ (खवलेला)
३. साखर एक वाटी
४. पाच-सहा पेढे
५. दोन चमचे पिठीसाखर
६. चमचाभर तूप

कृती-
 सफरचंदाच्या बिया काढून किसून घ्यावे, सफरचंदाचे साल काढून टाकावे, नारळ खऊन घ्यावा. एक वाटी साखर, नारळाचा खव आणि किसलेले सफरचंद सगळं एकत्र करून जाड बुडाच्या कढईत किंवा पॅनमध्ये घालून गॅसवर ठेवावे. घट्ट गोळा झाल्यावर गॅस बंद करावा. थोडे कोमट असताना त्यात पाच ते सहा पेढे आणि पिठीसाखर घालून चांगले मळून घ्यावे थाळीला तूप लावून थापावे व वड्या पाडून घ्याव्यात.

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

गाजराची बर्फी

गाजराची बर्फीच. हलवा किंवा कोशिंबीर नाही. आपण आज खरोखर गाजराची बर्फी शिकणार आहोत.

                    गाजरा ची बर्फी

साहित्य-
१. एक मोठा बाउल भरून किसलेले गाजर
२. तेवढाच बाऊल भरून खवलेले नारळ.
३. दीड वाटी साखर
४. नैवेद्याची वाटी भरून खवा
५. दोन चमचे पिठीसाखर
६. थाळीला लावण्यासाठी तूप

कृती-
सर्व गाजरे स्वच्छ धुऊन किसून घ्यावीत. एक मोठा बाउल भरून गाजराचा कीस तयार करण्यासाठी अर्धा किलो गाजर पुरेसे आहेत. तेवढाच बाऊल भरून खवलेला नारळ घ्यावा त्यात दीड वाटी साखर घालावी. सर्व पदार्थ एकत्र करून जाड बुडाच्या कढईत गॅस वर ठेवून आटवावेत. घट्ट गोळा झाल्यावर थोडा खवा आणि पिठीसाखर घालून चांगले मळावे थाळ्याला तुपाचा हात लावून त्याच्यावर तो गोळा व्यवस्थित थापून घ्यावा व वड्या पाडाव्यात.

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

टोमॅटो ची बर्फी

हल्ली बाजारात सर्वच प्रकारच्या वड्या किंवा बर्फी उपलब्ध आहे. पण आज जी बर्फी आपण शिकणार आहोत ती कुठल्याही दुकानात मिळत नाही. त्या बर्फी चे नाव आहे 'टोमॅटोची बर्फी'. हो तुम्ही बरोबरच वाचलेत, टोमॅटोची बर्फी.
टोमॅटोचे सूप, टोमॅटोचे सार, टोमॅटोची कोशिंबीर अगदी भाजी सुद्धा ऐकले असेल. पण त्याची स्वीट डिश होऊ शकते , हा थोडा धक्का असेल सगळ्यांसाठी. म्हणूनच आज ही वेगळी पाककृती आपण शिकणार आहोत 'टोमॅटो ची बर्फी'.

                              टोमॅटो ची बर्फी

साहित्य-
१. टोमॅटो अर्धा किलो
२. एक मोठा नारळ (खवलेला)
३. दीड वाटी साखर
४. नैवेद्याच्या वाटीभर खवा
५. दोन चमचे पिठीसाखर

कृती-
 टोमॅटो स्वच्छ धुऊन, चिरून मिक्सरमधून बारीक करून घेणे. स्टीलच्या चाळणीने गाळून घेणे. त्यात एक मोठा नारळ खऊन घालावा. अर्धी वाटी साखर घालून सर्व मिश्रण एकत्र करून जाड बुडाच्या कढईत किंवा पॅन मध्ये आटवायला ठेवावे. मिश्रणाचा घट्ट गोळा झाल्यावर कढईच्या कडेकडेला थोडी साखर सुटायला लागते. मग गॅस बंद करावा. त्यानंतर त्यात थोडा खवा घालावा गोळा चांगला एकजीव करून घ्यावा व त्याच्यामध्ये थोडी पिठीसाखर घालून मळून घ्यावा. एक मोठी थाळी घेऊन त्याला आतून तूप लावून घ्यावे. त्या थाळीत तो गोळा चांगल्या प्रकारे थापून घ्यावा व त्याच्या वड्या पाडाव्यात. पुढे तीन तासात तुमची टोमॅटोची बर्फी खाण्यास योग्य तयार होते.

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

दही वडा

एखादा पदार्थ असा असतो की जो पोट भरल्यानंतर देखील खावासा वाटतो, त्याचा मोह आवरत नाही. दहीवडा त्यापैकीच एक. दहीवडा प्रत्येकालाच आवडतो तो जेवणामध्ये कोशिंबीरीच्या ऐवजी म्हणून सुद्धा करता येतो आणि ब्रेकफास्टमध्ये किंवा चार वाजता चहा बरोबर खाण्यासाठी सुद्धा दहिवड्याचा समावेश करता येतो. झटपट होणारी, चविष्ट, सगळ्यांना मनापासून आवडणारी पाककृती दही वडा.

                               दही वडा

साहित्य-
१. उडदाची डाळ एक वाटी
२. मुगडाळ चार चमचे
३. तांदूळ दोन चमचे

दह्या साठी साहित्य-
दोन वाटी गोडसर दही, चवीपुरती दोन चमचे बारीक साखर, चवीप्रमाणे मिठ, किसलेलं आलं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, वरुन घालायला मिरी पावडर आणि लाल मिरची पावडर.

कृती-
 सर्व मिश्रण तीन तास भिजत ठेवणे. पाणी काढून मिक्सर मधून वाटून घेणे, मीठ घालून मंद आचेवर वडे तळावेत, म्हणजे वडे आतून कच्चे रहाणार नाहीत. तळलेले वडे गार पाण्यात टाकून पिळून घ्यावेत. गोड दह्यामध्ये थोडी पिठीसाखर, मीठ आलं किसून, कोथिंबीर बारीक चिरून घालावी आणि चांगले हलवून घ्यावे. डिशमध्ये वडे ठेवून त्यावर दही घालावे. प्रत्येक वड्यावर थोडी मिरी पावडर व लाल मिरची पावडर घालून खाण्यास द्यावे आणि हो... आपणही घ्यावे

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई) 

Friday, 17 April 2020

सुरळीच्या वड्या

मिठाईच्या दुकानात गेले कि हमखास लक्ष्य वेधून घेणारा पदार्थ म्हणजे सुरळीच्या वड्या. फक्त सुग्रण हातांनाच जमत असावा अशी शंका येणारा त्याचा पातळ पदर मोहात पाडतो. दुसरेच काहीतरी घ्यायला गेलेलो आपण नकळत सुरळीच्या वड्यांचीही ऑर्डर देऊन मोकळे होतो. पण आजपासून असे होणार नाही. त्याच वाघिणीच्या दुधाची म्हणजेच सुरळीच्या वड्यांची पाककृती आज शिकणार आहोत.

सुरळीच्या वड्या-

साहित्य-
१ कप बेसन [डाळीचे पीठ]
१ कप पाणी
१ कप ताक
१ चमचा मीठ
१ चमचा हळद
१ चमचा मैदा

सारण-
२ वाट्या कोथिंबीर
१  नारळ [खवलेले]

फोडणीसाठी-
२ छोटे चमचे मोहोरी
२ मोठे चमचे तेल

कृती-
बेसन [डाळीचे पीठ], पाणी , ताक [१-१ कप], मीठ, हळद, मैदा [१-१ चमचा] हे सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण तयार करून घेणे. मिश्रणात गाठ होता काम नये. हे मिश्रण एकजीव करून ५ मिनिटे चांगले शिजवून घेणे. शिजवताना मिश्रण सतत हलवत राहणे म्हणजे गाठ तयार होणार नाही. २ मिनिटे झाकण ठेऊन मंद आचेवर वाफ येऊ देणे. पांढरी वाफ निघाली कि मिश्रण खाली उतरवणे.
ताटाला मागच्या बाजूला तेलाचा हात लावून घेणे, त्यावर हे मिश्रण गरम असतानाच बोटाने पटपट पसरवणे. बोटाने जमत नसेल, चटका बसत असेल तर सपाट वाटीच्या मागच्या बाजूला पाणी लावून त्याने पसरवणे. मोहोरीची फोडणी तयार करून घेणे. ताटावर पातळ पसरवलेल्या सरणावर कोथिंबीर आणि नारळ पसरवून त्यावर फोडणी घालणे. सुरीने लांब लांब पट्ट्या कापून त्या गोल गुंडाळणे. झाली चटपटीत सुरळीची वाडी तय्यार. खजूर आणि चिंचेच्या गोड चटणी बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खायला देणे. 

१ वाटी बेसनात ४ ते ५ ताटांना सारण पसरवून लावता येते. 

- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई)